Thursday, March 28, 2024

सुधारित शेती अवजारे प्रशिक्षण व हस्तांतरण कार्यक्रम संपन्न

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प पशु शक्तीचा योग्य वापर विभागाच्या वतीने अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण व मूल्यवर्धन दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम व सुधारित शेती अवजाराचे हस्तांतरण कार्यक्रम दि. २७ मार्च रोजी आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि हे होते. आणि प्रमुख अतिथी म्हणून संचालक संशोधन डॉ. जगदीश जहागीरदार, संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, हे होते. कार्यक्रमासाठी विद्यापीठ अभियंता श्री. दिपक कशाळकर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. चंद्रकांत लटपटे यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, योजनेद्वारे हस्तांतरीत सुधारित शेती अवजारांचा शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर प्रत्यक्ष वापर करून कृषि निविष्ठांचा वापर आणि वेळेमध्ये बचत करावी. ही अवजारे शेतकऱ्यांचे श्रम कमी करून शेती उत्पादनवाढीस फायदेशीर ठरतील, तसेच आपल्या गावातील सोबतच इतर शेतकऱ्यांना या अवजारे व सुधारित तंत्रज्ञानाचा लाभ द्यावा. पिकाचे उत्पादन वाढीसाठी आवश्यक अवजारांबाबत संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञांना आपल्या प्रतिक्रिया देवून प्रोत्साहित करावे. विद्यापीठ शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत कार्य करते आणि भविष्यातही आपल्या पाठीशी राहील असे नमूद केले.
प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाच्या आयोजिका तथा संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोळंकी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सुधारित अवजारे तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी अन्नदाता पुरुष बचत गट, प्रकाशवाट शेतकरी उत्पादक कंपनी, आजेगाव, यशोधरा बचत गट, शिंदेफळ, सावित्रीबाई फुले महिला बचत गट, भिमक्रांती महिला बचत गट, पळशी तसेच वाघजडी ता. शेनगाव जिल्हा हिंगोली येथील ६० महिला व पुरुष शेतकऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. स्मिता सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. तुकाराम भुतकार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संजय देशमुख इंजि. अजय वाघमारे श्री. दिपक यंदे व यांनी पुढाकार घेतला.







Wednesday, March 27, 2024

वनामकृवितील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेचा १२ वा दीक्षांत समारंभ संपन्न

बालकांच्या विकासाकरिता कुटुंबातील वातावरण आनंदी असणे आवश्यक!.... कुलगुरू डॉ इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय अंतर्गत असलेल्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेचा १२ वा दीक्षांत समारंभ दिनांक २७ मार्च रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळा, मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागाद्वारे करण्यात आला होते. दीक्षांत समारंभात भारतीय संस्कृतीचे जपणूक करत विद्यावस्त्रे परिधान केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर विशेष अतिथी म्हणून विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके हे होते. व्यासपीठावर  कार्यक्रमाच्या आयोजक  सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, सहयोगी प्राध्यापक डॉ. निता गायकवाड आणि डॉ. वीणा भालेराव यांची उपस्थिती होती. 

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी सुरुवातीस आयोजकांचे अभिनंदन केले ते पुढे म्हणाले की, शिक्षणाची पहिली परीक्षा म्हणजे अंगी नम्रता येणे होय. नम्रतेने सर्वांगीण विकास साधने शक्य होते आणि याद्वारे जनहिताचे कार्य आणि सेवा साध्य करता येते. शिक्षणाने विद्यार्थ्यातील पात्रतेची क्षमता वाढून त्यांचे सहनशील व्यक्तिमत्व बनते. याकरिता पालकांनी त्यांच्या बालकांचे संगोपन नैसर्गिक वातावरणामध्ये करावे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा गुण असतो त्यास चालना द्यावी. आपल्या अपेक्षा त्यांच्यावर लादू नयेत‌. बालकांच्या विकासाकरिता कुटुंबातील वातावरण प्रसन्न आणि आनंदी ठेवावे. या विद्यापीठात पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते आचार्य पदवी पर्यंतचे शिक्षण दिले जाते ही एक अभिमानाची बाब असे नमूद करुन बालकांचा पार पडलेला  दीक्षांत समारंभाबाबत समाधान व्यक्त केले आणि बालकांना तसेच त्यांच्या पालकांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेस मागील ४१ वर्षापासून केलेल्या कार्याचा अतिशय उत्कृष्ठ असा इतिहास आहे. या कार्याचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना तसेच शाळेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या आयोजक सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांनी प्रास्ताविकात प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेने नवीन शैक्षणिक धोरणानुसार २०२३-२४ निपुण भारत मिशन याचा अवलंब केला असून याअंतर्गत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी पायाभूत शिक्षण सुरू केले असल्याचे विशद केले. याबरोबरच शाळेने वर्षभरात राबविलेल्या  विविध उपक्रमाची माहिती दिली.

समारंभात एकूण ४२ विद्यार्थ्यांना त्यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल  मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्रे प्रदान करण्यात आली. या समारोहात ब्रिज सेक्शनचे अन्वी डाके, सत्यजित गरुड, अद्विता सरनाईक, विघ्नेश कसलवार, अनन्या कुंभार, आणि वेदिका सुभेदार यांनी शाळेविषयी त्यांच्या असणाऱ्या हृदयस्पर्शी भावना प्रतिनिधिक स्वरूपात व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वीणा भालेराव, डॉ. निता गायकवाड, प्रा. प्रियंका स्वामी आणि प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षिका आणि मदतनीस यांनी केले. सुत्रसंचलन आणि आभार डॉ वीणा भालेराव यांनी मानले. या कार्यक्रमांमध्ये जनसंपर्क अधिकारी डॉ. शंकर पुरी, विस्तार शिक्षण विभागाचे डॉ. विद्यानंद मनवर, शाळेचे विद्यार्थी, महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे पालक यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला.

 







Saturday, March 23, 2024

आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी २० (लेदर बॉल) क्रिकेट स्पर्धेत वनामकृवि संघास उपविजेतापद

 खेळातून जिंकण्याची जिद्द निर्माण होते .......कुलगुरू डॉ. इन्द्र मणि


महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी २० (लेदर बॉल )क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे दिनांक ११  ते १७  मार्च २०२४  दरम्यान करण्यात आले होते. स्पर्धेत महाराष्ट्रातून मुंबई, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर व इतर  अश्या एकूण १६ विद्यापीठ संघाने सहभाग नोंदविला. सुरवातीच्या उपांत्य सामन्यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संघाने गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संघाचा ३९ धवांनी तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाने लोणेरे संघाचा पराभव करून दोन्ही संघाने अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला. अंतिम सामन्यात वनामकृवि परभणी संघाने उपविजेतापद तर सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाने विजेतेपद पटकविले. विजेत्या व उपविजेत्या दोन्ही संघांनी साखळी सामन्या मध्ये उत्कृष्ठ प्रदर्शन केले. वनामकृविच्या क्रिकेट कर्मचारी संघाने कुलगुरू चषक टी २० (लेदर बॉल )क्रिकेट स्पर्धेतील पदार्पणच्या दुसऱ्याच वर्षी मिळवलेले यशाने विद्यापीठ प्रशासनात आणि कार्माचार्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.  या यशाबद्दल माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, यांनी संघाचे अभिनंदन केले आणि खेळातून जिंकण्याची जिद्द निर्माण होते आणि कार्यक्षमता वाढते म्हणून प्रत्येकांनी एकद्यातरी खेळाचा छंद जोपासावा असा सल्ला दिला. २५ व्या दीक्षांत समारंभाच्या निमिताने विद्यापीठात आलेले वनामकृविचे माजी कुलगुरु  डॉ. के. पी. गोरे डॉबी व्यंकटेश्वरलू आणि  डॉअशोक ढवणतसेच संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संचालक विस्तार डॉ धर्मराज गोखले, संचालक संशोधन डॉ. जगदीश जाहागीरदार, कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री. दिपक कशाळकर, विध्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरषोत्तम झवर, सहाय्यक कुलसचिव श्री रामजी खोबे तथा सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यापीठ परिवार यांनी संघाचे अभिनंदन करून भविष्यातील यशासाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत परभणी संघाच्या वतीने श्री मारोती शेल्लाळे यांनी सर्वात जास्त विकेट घेऊन  स्पर्धेत दुसऱ्या स्थान प्राप्त केले. तसेच डॉ. धीरज पाथ्रीकर (कर्णधार) यांनी परभणी संघातर्फे सर्वाधिक धावा काढून स्पर्धेत चौथ्या स्थानी राहिले. दोघांनी तसेच संघाच्या इतर कर्मचारी खेळाडूंनी (कऱ्हाळे, ढगे, शे.जमीर, सावंत, ननवरे, यादव, बनसोडे, पिल्लेवड, गरुड, शे.उस्मान, शिंदे व मोहिते असे सर्वांनी एकजुटीने संघाला अंतिम सामान्या पर्यंत नेण्याची महत्वाची कामगिरी पार पाडली. या संघांचे विद्यापीठ परिवारात सर्वत्र कौतुक होत आहे.

Friday, March 22, 2024

जागतिक जल दिना निमित्त जलपूजन व जल जागृती कार्यक्रमाचे आयोजन

 पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवावे .... डॉ. उदय खोडके


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठतील सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाद्वारे जागतिक जल दिना निमित्त जलपूजन व जल जागृती कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २२ मार्च रोजी करण्यात आले. कार्यक्रमासाठी संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके हे अध्यक्षस्थानी होते तर संचालक संशोधन डॉ.जगदीश जहागीरदार, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, डॉ. चंद्रकांत लटपटे, डॉ. मदन पेंडके, डॉ. सुमंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ. उदय खोडके यांनी आधुनिक शेती फायदेशीर करण्यासाठी पावसाचे वाहून जाणारे पाणी शेततळयात साठवून वापरणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तद्नंतर संचालक संशोधन डॉ. जगदीश जहागीरदार यांनी आधुनिक सिंचन प्रणालीचा अवलंब करून दैनंदिन जीवनात पाण्याचा काटकसरीने वापर करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. कार्यक्रमात डॉ. मदन पेंडके, डॉ. सुमंत जाधव यांनी पाणी बचती बद्दल मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक डॉ. हरीश आवारी, यांनी केले तर आभार डॉ. विशाल इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनिकेत वाईकर, युवराज भोगील यांनी प्रयत्न केले. कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणी आणि कृषि महाविद्यालय , उदगीर येथील विद्यार्थी तसेच पाणी व्यवस्थापन प्रकल्प, रेशीम व ऊतीविद संवर्धन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.



वनामकृवित जागतिक जल दिन साजरा

 जल वापराबाबत संवेदनशील राहावे..... कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात शिक्षण संचालनालयद्वारे जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांनी आभासी माध्यमाद्वारे अध्यक्ष पद भूषविले. यावेळी संचालक शिक्षण  डॉ. उदय खोडके, सहयोगी अधिष्ठाता डॉ जया बंगाळे, डॉ संजीव बंटेवाड, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, डॉ पी.एस. नेहरकर, डॉ. दिगंबर पेरके, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी.आर. झंवर आदींची उपस्थिती होती आणि संचालक संशोधन डॉ. जगदीश जहागीरदार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. भगवान असेवार आणि डॉ राकेश अहिरे हे आभासी माध्यमाद्वारे सहभागी झाले होते.

अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि म्हणाले की, यावर्षीच्या जागतिक जल दिनाच्या निमित्ताने "शांततेसाठी जल" ही संकल्पना आहे, म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे. यासाठी पाण्याचे व्यवस्थापन आणि वितरण व्यवस्थित तसेच काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. मराठवाडा हा सतत दुष्काळग्रस्त असतो. यामुळे पाण्याची पातळी अतिशय खोलीवर गेलेली आहे, म्हणून पाणी वापराबाबत अतिशय संवेदनशील राहून सिंचन साठ्यात मोठी वाढ करावी लागेल तसेच शेततळ्यांची संख्या वाढवून पाण्याचे स्त्रोत वाढवावे लागतील. सिंचनासाठी पाणी वापरत असताना सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करावा असे नमूद केले.

कार्यक्रमात संचालक शिक्षण डॉ उदय खोडके यांनी पावर पॉइंटद्वारे मार्गदर्शन करून पाण्याचे महत्व पटवून दिले. यात त्यांनी सजीव-निर्जीव वस्तू साठी पाण्याची गरज असते, वाहून जाणारे पाणी थांबविले पाहिजे याबरोबरच पाण्याचा वापर बहुविध प्रकारे आणि पूर्ण क्षमतेने करावा, उपलब्ध जमिनीपैकी किमान १५% जमीन जलसाठा करण्यासाठी उपयोगात आणावी पिकासाठी वापरात येणारे पाणी दहा टक्के वाचले तर इतर क्षेत्रासाठी त्याचा ४० टक्के वाटा मिळतो, या सर्व बाबी सांगितल्या. तसेच विद्यापीठाने कमी पाण्यावर येणारे अनेक वाण तसेच पाण्याची बचत होणाऱ्या लागवड पद्धती विकसित केलेल्या आहेत. या सर्व शेतकऱ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होणे आवश्यक आहे असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धीरज पाथ्रीकर यांनी तर आभार डॉ. गणपत कोटे यांनी मानले. कार्यक्रमात विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.



Tuesday, March 19, 2024

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

विद्यापीठाचे माननीय कुलपती तथा माननीय राज्यपाल महाराष्ट्र शासन यांनी वनामकृवितील ११००२ स्नातकांना विविध पदवीने केले अनुग्रहित

हवामान बदलास अनुरूप पीक पद्धती विकसित करावी.....मा.राज्यपाल श्री. रमेश बैस


भारताने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय घेतला आहे. यासाठी कृषि क्षेत्रांनी महत्त्वाची भूमिका निभवावी लागेल. कृषि मध्ये आता व्यापारीकरण आणि उच्च किमतीच्या पिकांच्या उत्पादनावर भर दिला जात आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कृषि हा कणा असून कृषि क्षेत्राचे घरगुती उत्पादनामध्ये जवळपास १५ % आणि निर्यातीमध्ये १३ टक्के वाटा असून जवळपास ५०ते ६० टक्के लोकसंख्या ही कृषि आणि संबंधित रोजगारावर अवलंबून आहेत. भारताने स्वातंत्र्यानंतर कृषि क्षेत्रात अनेक क्रांती केल्या. सध्या कृषि क्षेत्र इंद्रधनुष्य क्रांतीकडे वाटचाल करत आहे. असे प्रतिपादन माननीय कुलपती तथा माननीय राज्यपाल महाराष्ट्र शासन श्री. रमेश बैस यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा २५ वा दीक्षांत समारंभ १९ मार्च रोजी संपन्न झाला, यावेळी ते दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते.

दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थान विद्यापीठाचे माननीय कुलपती तथा माननीय राज्यपाल महाराष्ट्र शासन श्री रमेश बैस यांनी आभासी माध्यमातून द्वारे भूषविले आणि प्रमुख अतिथी भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉ. संजय कुमार यांनी दीक्षांत अभिभाषण केले तर वनामकृविचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, पदेकृविचे कुलगुरू डॉ शरद गडाख, माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील,  विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. आर. . मराठे, श्री. दिलीप देशमुख, विद्वत परिषदेचे सदस्य डॉ. पी जी इंगोले, वनामकृविचे माजी कुलगुरु डॉ. सी. डी. मायी, डॉ. के. पी. गोरे,  डॉ. बी व्यंकटेश्वरलू, डॉ. अशोक ढवण, वनामकृविचे शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, कुलसचिव श्री पुरभा काळे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ जगदीश जहागीरदार, संचालक बियाणे डॉ. देवराव देवसरकर, मकृशिसंपचे शिक्षण संचालक डॉ. हेमंत पाटील, वनामकृविचे उपपुलसचिव डॉ. गजानन भालेराव, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ आणि सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात वनामकृविचे माननीय कुलपती तथा माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य श्री.रमेश बैस यांनी सर्व स्नातकांचे आणि त्यांच्या माता पित्यांचे स्नातकांनी मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण २०२० मुळे भारतीय शैक्षणिक व्यवस्थेमध्ये नव्या युगाची सुरुवात होत असून यामध्ये विद्यार्थी केंद्रीत, सर्व समावेशक आणि भविष्यातील शैक्षणिक व्यवस्थेचा मार्ग प्रशस्त होणार असून वनामकृवि हे यामध्ये अग्रेसर आहे. या विद्यापीठातील ३५ टक्के पेक्षा  अधिक पदवी स्नातक आणि ६१ पेक्षा अधिक पदव्युत्तर स्नातक यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला रोजगार मिळवला असून काही स्नातकांनी आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय उभारला आहे, ही एक आनंदाची बाब आहे. या विद्यापीठाने ३० पेक्षा अधिक राष्ट्रीय संस्था सात आंतरराष्ट्रीय संस्था १४ उद्योग क्षेत्रे आणि २५० शेतकरी उत्पादक कंपन्यासोबत सामंजस्य करार केले असून  अमेरिकेतील जागतिक दर्जाचे विद्यापीठ आणि जर्मन फेडरल सरकारचे जर्मनी येथील जीआयझेड कंपनी सोबत संशोधन कार्य सुरू केले आहे. यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधन कार्यास प्रोत्साहन मिळणार आहे. भविष्यात विविध समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला तयार राहावे लागेल. भारत जगातील सर्वात अधिक लोकसंख्येचा देश होऊ पाहत असून जमीनधारणा घटत आहे. आपणास अन्नधान्य उत्पादनामध्ये आत्मनिर्भर व्हावयाचे आहे. यासाठी गरजेनुसार आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भर द्यावा लागेल तसेच हवामान बदलावर आधारित पीक पद्धती विकसित करून त्याचे प्रभावीपणे विस्तार कार्याद्वारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवाव्या लागतील. यासाठी वनामकृविने उल्लेखनीय कार्य केलेले असून भविष्यात सुद्धा हे विद्यापीठ आणि विद्यापीठाचे स्नातक उत्कृष्ट कार्य करून आपले योगदान देतील असे संबोधित करून विद्यापीठास आणि सर्व स्नातकांना शुभेच्छा दिल्या.

माननीय कुलपती तथा माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य श्री. रमेश बैस यांनी स्नातकांना सत्याच्या मार्गावर राहून देशाप्रती समाजाप्रती प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्याची शपथ देऊन विविध विद्याशाखेतील ११००२ स्नातकांना विविध पदवी,  पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवीने अनुग्रहित केले.

दीक्षांत अभिभाषणा बोलताना भारतीय कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉ. संजय कुमार यांनी असे नमूद केले की, कृषि शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपली स्वतःची ओळख निर्माण करावी आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकरी बांधवांच्या कल्याणाकरिता करावा. दीक्षांत समारंभाच्या दिवसाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असतात, हा समारंभ म्हणजे विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फलित होय. आज पासून आपल्या जीवनाला एक नवी दिशा आणि चालना मिळणार आहे. अनेक हुशार विद्यार्थी कृषि शिक्षणाची मुद्दामहून निवड करतात, यामुळे कृषि क्षेत्रात उत्कृष्ट संशोधन होण्यास मदत होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये नावीन्य शोधण्याबरोबरच चिकित्सक वृत्ती, सकारात्मक दृष्टीकोन आणि सांघीकरित्या प्रश्न सोडवण्याची कला विकसित होणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधनाची ओळख होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने आपल्या ५५ विद्यार्थ्यांना आणि २५ अधिकाऱ्यांना नाहेप प्रकल्पांतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जेच्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्पेन, हंगेरी, मलेशिया, थायलंड, कॅनडा आणि ब्राझील येथील विद्यापीठात पाठवून सक्षम मनुष्यबळाची निर्मिती केली यातून शैक्षणिक आणि संशोधन कार्यास नवी दिशा मिळणार आहे. भविष्यामध्ये कृषि उत्पादनाची गरज भागवण्यासाठी अधिक उत्पादन देणारे वाण विकसीत करणे, औषधी आणि सुगंधी वनस्पतींची लागवडीवर भर, बियाणांचा दर्जा वाढवून बियाणे सहज उपलब्ध करणे, कृषि संशोधनामध्ये आणि विकासामध्ये भरीव गुंतवणूक करणे, अचूक शेती पद्धती, शेतीमध्ये यांत्रिकीकरण, काढणी पश्चात तंत्रज्ञानावर संशोधन करून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना द्यावे लागेल शिवाय शाश्वत बाजार व्यवस्था उभारून शेतीमालास चांगला भाव मिळवून देऊन शेतकऱ्यांना समृद्ध करावे लागेल. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करावा. यासाठी विद्यापीठ आणि  स्नातक त्यांच्या ज्ञानाचा उपयोग रून हे कार्य पुढाकाराने करतील असे त्यांनी आपल्या अभिभाषणात नमूद केले.

स्वागतपर भाषणात वनामकृवीचे मा.कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर करताना म्हणाले की, विद्यापीठ शेतकरी केंद्रीत विस्तार कार्य, विद्याथी केंद्रीत शिक्षण, नवाचार केंद्रीत संशोधन आणि कर्मचारी केंद्रीत प्रशासन हा दृष्टीकोन ठेऊन कार्य करत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. डी. जी. मोरे यांनी केले. दीक्षांत समारंभास शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, प्रगतशील शेतकरी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या युट्यूब चॅनल वरून करण्यात आले होते.

२५ व्या दीक्षांत समारंभातील पदके व बक्षिसे

दीक्षांत समारंभात विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने निश्चित केलेले २९ सुवर्णपदके आणि दात्याने निश्चित केलेले १९ सुवर्णपदके दोन रोप्य पदके तसेच २० रोख पारितोषिके असे एकूण ७० पदके आणि पारितोषिके पात्र असणाया विद्यार्थ्यांना प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये, सायली चांदगुडे (दोन पदके), राधा लोलगे,शुभम काळे, शीजागुरुमयुम रमालक्ष्मी देवी, अंबरीश एस., क्रांती कांबळे, प्रतीक मोघे, राजकुमारी ज्योतिका, योगेश होट्टीगोदर, हिना शेख (दोन पदके), निकिता गोरडे, श्वेता बी. एस. (पदक व रोख पारितोषिक), योगेश मात्रे, मोहम्मदी बेगम (तीन पदके), प्राजक्ता चव्हाण, कोंडापल्ली  श्रीवैष्णवी, सुषमा माने, अमलाज्योती सार,  प्रतीक्षा जाधव, ऋतुजा सातपुते, कुरापती कृष्णवेणी, शितल मामडी, रमालक्ष्मी गुडीपती, नेहा माटरा, या पदव्युत्तर स्नातकांना आणि भक्ती बिनगे, इंद्रजीत पोळ (तीन पदके), विशाल कुलकर्णी, प्राची गट्टानी, श्याम अभाळे, कोमल कदम,  कृणाल पाटील, समृद्धी वांगस्कर, श्रुतिका सोळंके, शैल बाला, नंदिनी बावनकर (तीन पदके), अपेक्षा गागरे, गायत्री काबरा, अद्या शैबू, गौरी चौधरी, यश एंगडे, वैष्णवी काकडे या पदवीधारक स्नातकांना विद्यापीठ सुवर्ण पदकांनी गौरविण्यात आले तर राकेश बागमारे, प्रियंका लोखंडे, प्रियांका नखाते, प्रियंका पाटील, शीजागुरुमयुम रमालक्ष्मी देवी, प्राची गट्टानी, विशाल कुलकर्णी, रमालक्ष्मी गुडीपती, मयूरी बहीर, सुषमा माने, अपेक्षा गागरे या स्नातकांना रोख पारितोषकांनी गौरविण्यात आले.